तेरा मेरा ये आशिया (लघुकथा)

 तेरा मेरा ये आशिया (लघुकथा


दारावरची बेल वाजली आणि मी पेपर बाजूला करून दरवाज्याकडे नजर वळवली. स्मिताने दार उघडलं आणि शिवराम आत आला. हातात कसलीतरी पुडी.

‘अरे ये ना. काय काम काढलं सकाळी सकाळी?’ मी पेपर घडी करता करता विचारलं. शिवराम आमचा वॉचमन. सहसा रात्रपाळी करतो. सकाळी गाड्या धुतो. सकाळी मी गाडी काढली कि हा जास्वंदचं फुल घेवून हजर.

‘सायेब पेडे आनल्येत. धावीचा रिजट लागला ना काल.’

‘अहो त्याची मुलगी दहावीला होती यंदा. काय नाव रे, संजना न रे.’ स्मिताने किचन मधूनच मला अपडेट दिला.

‘अरे वा. छान. किती मार्क मिळाले संजनाला?’

‘८२%’ म्हणत शिवरामने पेढे द्यायला हात पुढे केला. इतक्यात स्मिताहि हात पुसत पुसत बाहेर आली.

‘अरे वा. बरीच हुशार आहे कि तुझी लेक. काय करायचं म्हणते पुढे?’ मी.

‘आता त्यातलं मला काय सुधरत नाय सायेब. त्या मायलेकी जे काय ठरवतील ते. कोलेज जवल असायला पायजे म्हनतात. दोगींना बरं पडल.’ म्हणंत शिवरामने माझ्या हातात दोन पेढे टेकवले. ‘अरे आम्हा दोघांना एक पेढा पुरे. तुला बाकी ठिकाणीही वाटायचे असतील ना. शेवटी आनंद मोठा. काय?’

‘म्हनून तर दोन पेडे सायेब. एक संजानासाटी आणि दुसरा तिच्या आईसाटी’

‘बरोबर, आईच्या सपोर्ट शिवाय मूलं दहावीला बरे मार्क मिळवू शकतात काय.’ इति सौ.

‘तसं न्हव. संजनाची आईपन धावीला बसली होती ना. तिला ६२% पडले.’

‘काय?’ स्मिता आणि मी फक्त हवेत उडायचेच बाकी होतो.

‘व्हय सायेब. संजनाने म्हटलं म्हनून तिच्या आईनं नाईट स्कूल मदुन अब्यास केला. ती शालेत जायची तवा संजना जेवान बनवायची. दोगी अब्यास करायच्या. आपन अनाडी मानुस. चौती पास. पन आज पार डिग्री मिलाल्यासारक वाटतंय. नशिबानं फेल केलं, पन माज्या मुलीनं पास केलं मला सायेब.’

स्मिताने देलेले बक्षिसाचे पैसे घेवून शिवराम निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून मी हात जोडले. देवाचा कौल अजब असतो नाही. एका हाताने चिमुटभर काढून घेतो आणि मग ओंजळभर देतो....

© मानस (sondeshca@gmail.com(९७६९३६२८१८)

आवडल्यास जरूर शेअर करा....विशेष विनंती: माझे लिखाण माझ्या नावासहित व फोन नंबरसहित फॉरवर्ड करण्यासाठी माझी काहीही हरकत नाही. बाकी हृदयस्थ परमेश्वर साक्षी आहेच. धन्यवाद... 

Comments

Popular posts from this blog

#दुनीयाने_हमको_दिया_क्या

Never Eat Alone (Book Review)

जिंदगी_जिंदादिली_का_नाम_है (त्रिवेणी लघुकथामाला - भाग १)