आबोदाना ढुंडते है (लघुकथा)

आबोदाना ढुंडते है (लघुकथा)


दाराच्या उजवीकडे भिंतीवर मोठ्या अक्षरात लोगो कोरला होता - 
अरिहंत इंटरप्रायजेस’ आणि खाली ट्यागलाईन ‘वूय बिल्ड ड्रीम्ज’. सतीशने सविताकडे पाहिलं. तिने खुणेनेच त्याला आत जावूया म्हटलं.

काचेचा डिझायनर दरवाजा ढकलून दोघे आत गेले. आत शिरल्या शिरल्या थंडगार वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावरून गेली. वाह! एसी ऑफिसमध्ये शिरल्यावर कसं छाssन गार गार वाटतं. समोरच्या भिंतीवर एक सुंदर निसर्गचित्र होतं. शेजारच्या कोपऱ्यावर एक सुबक गणेशमुर्ती. समोर साधारण साडेतीन फुट उंच समयी. दोन्ही बाजूने लेदरचे प्रशस्त सोफे आणि मधोमध एक मॉडर्न टीपॉय. सविता त्या टीपॉयकडे बघतच राहिली. अस्साचअगदी अस्साच टीपॉय घ्यायला हवाय नवीन घरासाठी.

मे आय हेल्प यु सर?” रीसेप्शनवरच्या तरुणीने सतीशला म्हटलं. लगेचच त्याने घर बघायला आलोय सांगितलं. तिने एक फॉर्म भरायला दिला. सतीशने फॉर्म भरेपर्यंत सविता एक एक गोष्ट निरखत होती.

थ्यांक्यू सर. यु ह्याव रिकवायरमेंट ऑफ वन बीएचके अपार्टमेंट. आमचे एक्झिक्युटिव सध्या बिझी आहेत. तोपर्यंत संतोष तुम्हाला शो फ्ल्याट दाखवेल. मग तुम्ही सेल्स टीमशी व्यवहाराचं बोलून घ्या.”  

संतोष सोबत दोघेही दुसऱ्या मजल्यावर गेले. लॉबीच्या मधोमध प्रोजेक्टचं सुबक मॉडेल मांडून ठेवलं होतं. संतोष माहिती देऊ लागला.

"सर या आहेत २२ मजल्याच्या सहा इमारती. म्हणजे फक्त फेज वन बरं का. प्रोजेक्टमध्ये जिम विथ क्लबहौउस आणि चिल्ड्रेन्स प्ले एरिया आहे सर.  शिवाय दोन हाय स्पीड लिफ्ट्स२४ तास वॉटर सप्लायजनरेटर ब्याकप पण आहे. अँपल कार पार्किंग आणि एक गणेश मंदीर आहे. जैन मंदिराचं काम पुढच्या वर्षी संपलं कि रेट्स अजून २० टक्क्यांनी वाढणार.” 

संतोषने सिक्युरीटी गार्डकडून एका फ्ल्याटची चावी घेतली. शूजस्यांडल्स काढून तिघेही आत शिरले. संतोषने पटापट दिवे आणि पंखे चालू केले.

सतीशने सभोवताली नजर फिरवली. सी शेप लिविंग रूम. दिवाणखान्याला लागून डायनिंगची सोय. शिवाय एक्सट्रा बाथरूम देखील. ‘मस्ट बी अठरा बाय अकरा’- सतीशने गणित मांडलं. प्लस ५० स्क्वेरफिट डायनिंग. किचनही ६X९ फूटबऱ्यापैकी स्पेस. पॅसेजमध्ये उगीचच जागा वाया घालावलेय.... वास्तूप्रमाणे दिशाही बघायला हव्यात.

सविताचं लक्ष हॉलमधल्या झुंबराकडे होतं. एलईडी लाईट्स विथ थ्री कलर ऑप्शन्स. किचनमधलं मोड्युलर फर्निचर सुद्धा तिच्या चॉइसचं. ड्राय बाल्कनी वॉशिंग मशीन साठी. इथे कपडे पण सुकवता येतील पावसाळ्यात. दोन दोन बाथरूम. म्हणजे सकाळी सकाळी धावपळ नको. बेडरूममध्ये किंगसाईज बेड. मागच्या बाजूला यांग आणि यीनचं छान पेंटिंग. एका बाजूला ड्रेसिंग टेबल आणि दुसरीकडे बाथरूमच्या दोन्ही बाजूने कपाटं. हे मोरपिसांचं वॉलपीस पण अस्सच्या अस्स विकत घ्यायला हवं. छान हवेशीर बेडरूम.         

सतीशनं संतोषकडून महत्वाची माहिती घेतली. कार्पेट एरियाफ्लोर राईज़प्रोजेक्ट अपृवलपजेशन डेट वगैरे वगैरे. तिला अजून थोडा वेळ घालवायचा होता तिथे. म्हणून सतीश सेल्स एक्झिक्युटिवला भेटायला गेला. त्याने सगळे कामार्शियल्स समजून घेतले. लोन रिकवायरमेंटपेपरवर्कअवेलेबिलीटी ई. साधारण अर्ध्या तासाने तो जेंव्हा पुन्हा स्याम्पल फ्ल्याटवर आलातेंव्हा सविता किचनमध्येच घुटमळत होती.

चला म्याडम. आजचा चहा खाली टपरीवर आहेईथल्या किचनमध्ये नाही.” 

बोलायला मिळावं म्हणून दोघेही बाहेरच्या टपरीवर आले. चहाची आर्डर देवून त्यांनी कट्यावर अड्डा जमावला. तिने पडद्याचे रंग आणि डिझाईन सांगितले. त्याने ईएमआयचे आकडे. तिने नेमप्लेटची नक्षी सुचवलीत्याने कार पार्किंग कम्पल्सरी नको होतं म्हटलं. तिने सोफ्याच्या ऐवजी भारतीय बैठक ठरवून टाकली. त्याने वार्डरोब क्यान्सल करून जुनं कपाट एड्जस्ट करून टाकलं. तिनं हॉल मध्ये झोपाळा बांधला त्यानं टोकन अमाऊंटची जुळवाजुळव  केली. तिनं बाल्कनीत गुलाब आणि तुळसी सोबत अडेनियम लावायचं ठरवलं. आणि सतीशने बाईक विकायचं ठरवलं. आणखी बरंच काही ठरवून ती दोघं निघाली....

***************************************************************************************

रविवारचा दुसरा चहा सतीशपुढे ठेवून सविता किचनमध्ये गेली. साडे  दहा वाजले रे. आतातरी अंघोळ आटपून घे रे. बरीच कामं खोळंबलीयेत.

प्रोपर्टी पुरवणीत डोकं खुपसून सतीश काहीतरी शोधत होता. “अग ए. इकडे ये लवकर. हे बघ काय शोधलंय मी.

पेपरवर बोटाने सर्कल करून सतीशने तिला दाखवलं.

ननावरे इन्फ्रास्ट्रक्चर. वेदांत आर्केड. १ बिएचके बजेट फ्लॅट- ३२० स्क्वेअर फीट कार्पेट. जीबी रोडठाणे. स्टेशन पासून फक्त ६ किमी वर. सर्व आधुनिक सोईसुविधांनी युक्त. फक्त ४५ लाखात आपलं स्वप्नांचं घरकुल. मोड्युलर किचन फ्री फक्त पहिल्या ५० लकी ग्राहकांसाठी. आजच भेट द्या. ननावरे ग्रुप- स्वप्नांना द्या पंख

सविता पुन्हा तिच्या ड्रीम किचन मध्ये गेली. मग बेडरूम मध्ये बागडली. आणि हॉलमधल्या....सॉरी बाल्कनीतल्या झोपळ्यावर हिंदोळे घेतले.

खरं वाटत नसेल तर आजच भेट द्या खालच्या पत्त्यावर -

सविता अँड सतीश देसाई, H/१००३वेदांत आर्केड, जीबी रोडठाणे (प.)
            
दिवाणखान्यातला  टीपॉय  बघा. अँड डोन्ट  मिस  द पेंटिंग बिहाईंड द बेड - यांग आणि यीन.

स्वप्नं शेवटी स्वप्नं असतात. त्यांना फक्त पंख असतात. ना असतात रंग ना आकार. ती मोजता येत नाहीत स्क्वेअरफीट मध्ये.....

-    © मानस (sondeshca@gmail.com) (९७६९३६२८१८)

आवडल्यास जरूर शेअर करा....विशेष विनंती: माझे लिखाण माझ्या नावासहित व फोन नंबरसहित फॉरवर्ड करण्यासाठी माझी काहीही हरकत नाही. बाकी हृदयस्थ परमेश्वर साक्षी आहेच. धन्यवाद...

Comments

Popular posts from this blog

#दुनीयाने_हमको_दिया_क्या

Never Eat Alone (Book Review)

जिंदगी_जिंदादिली_का_नाम_है (त्रिवेणी लघुकथामाला - भाग १)