#तू_ना_जाने_आसपास_है_खुदा (लघुकथा)
तू ना जाने आसपास है खुदा
निवडलेल्या कचऱ्याची पिशवी खांद्यावर टाकून ती चालू लागली. डम्पिंगच्या मोठ्ठ्या भिंतीजवळ येवून तिने अंदाज घेतला. मग हळूच सरकत ती ढिगाऱ्याजवळ थोडी पुढे गेली. तिथला कचरा बाजूला सारल्यावर पत्रा दिसू लागला. पत्रा उचलला कि दिसतं भिंतीला असलेलं भगदाड. सगळ्या कचरेवाल्यांसाठी भाईने केलेली चोरवाट. आधी तिने पिशवी बाहेर टाकली आणि मग स्वत: बाहेर उडी मारली. नाल्याच्या कठड्यावरून चालत चालत ती दुसऱ्या टोकावर पोचली. तिथून फार जास्त लांब जायचं नव्हतं तिला. पण अचानक तिची पावलं थबकली. क्षणभरातच तिचं लाकूड झालं. उसनं अवसान आणून तिने तोंड उघडलं.
“ए इम्रान. आपली वाट अडवायचं काम
नाय. मी भायला चायपानी कदीच दिलाय.”
बाईकवर टांग मारून डावीकडे रेलून
इम्रान बसला होता. राउंड नेकचा हिरवा टीशर्ट आणि च्योकलेटी जीन्स. गळ्यात
सायीबाबाचं पेंडंट, दंडावर मकदूम अलीच्या दर्ग्यावरचं तावीज. केसांना बरगंडी
रंगाचा हेअर डाय आणि मागे पोनीटेल. कल्ले तलवारीसारखे धारदार वाढवलेले आणि छोटीशी
खुंटलेली दाढी.
“भोत बोलने लगी है बे तू. टेम बुरा
चलरेला है तेरा. रोज रोज दो बार कचरा उठायेगी तू और चाय एक बार पिलायेगी तो कैसा
चलेगा” बाईकवरून उतरून इम्रान पुढे आला.
“वो सब हिसाब मै भायसे कर लेगी. तू
टाईम खोटा मत कर मेरा.” म्हणून ती त्याला उजवीकडून बगल मारून जायला लागली. एका
झटक्यात इम्रानने तिचा डावा हात पिरगळला. तिचा हात पाठीमागे मुडपून दुसऱ्या हाताने
त्याने तिची मान पकडली.
“अपुनसे ज्यादा शानपत्ती करनेका नय,
क्या. तेरा मुसाभाई भी अपुन को ऐसा चिल्लर के माफिक झटकता नयी.”
त्याच्या तावडीतून सुटायचा निष्फळ
प्रयत्न ती करू लागली. तिची धडपड बघून इम्रान अजून चेकाळला.
“तेरेको हफ्ता मांगा, तो तू आंखे
दिखाती है मेरेको. इम्रान भाई को. साला सारे गोवंडी मे अपुन को नडने को सब डरताय
और तू साली अपुन को आजमायेगी? तेरी सारी अकड आज तेरे कचरे के डब्बे मे नई डाली ना
तो नाम बदल देगा मै”...त्याच्या डोळ्यात रक्त उतरायला लागलं. श्वास चढायला लागला.
एका हाताने तिचं मुस्काट दाबून दुसऱ्या
हाताने तिला आवळून धरलं होतं त्याने. अक्ख अंग पिळून ती झटके देत होती. तिला तशीच फरफट
घेवून तो नाल्याच्या कोपऱ्यापर्यंत आला. झाडीच्या आत तिला ढकलून त्याने चाकू
काढला. आत्याल्या बाजूला मोठ्ठा पाईप होता. त्यात ढकलून तो जबरदस्ती करू लागला.
तिने एक मोठ्ठी आरोळी ठोकली. बाजूने जाणाऱ्या एकाने आत डोकावून पाहिलं. इम्रानने
चाकुनेच नुस्ता इशारा केला. तसा तो लुक्खा शेपटावर पाय देवून पळून गेला.
‘नीच साले. सगळे मर्द नामर्द.
त्याच्यासारखे, नाहीतर ह्या इम्रान सारखे.’ ती स्वतःशीच बोलली
इम्रानने तिच्याच ओढणीने तिचं तोंड
बंद केलं. एवढ्यात पायपाच्या कोपऱ्यावर काहीतरी चमकलेलं दिसलं तिला. बीअरची बाटली
वाटतं. अंगात आहे तितकी ताकद लावून तिने हिसका दिला आणि इम्रानला ढकललं. झेप घेवून
बाटली उचलली. पायपावर बाटली आपटून अर्धी फोडली. एका हाताने दुपट्टा खाली सारून टी
किंचाळली.
“कमीनेss. आ. अब तू आ. तेरे को तेरी
अम्मी याद दिलाती हुं. आ.”
इम्रान तिच्या अंगावर झेपावला. तिने
बाटली त्याच्या पोटात खुपसायच्या आत त्याने तिचा हात पकडला. दोघांची झटापट व्हायला
लागली. इम्रान हा मौका सोडणार नव्हता. बाटली फेकून त्याने तीच्या सरवार वर हात
टाकला आणि इतक्यात मागून कोणीतरी ओरडलं...
“एss हरामी. बच्ची को छोड इम्रान. नई
तो घागरे मे सारी जिंदगी गुजारनी पडेगी.”
एखादं भूत पाहिल्यागत इम्रान
थरथरायला लागला. त्याची मस्ती उतरली. कसाबसा धडपडत तो पायपाच्या दुसऱ्या टोकाकडून
पळून गेला.
ती हमसाहमशी रडू लागली. पार ढेपाळून गेली होती
ती.
“एss बच्ची. रोयेगी तो किसी ना किसी दिन सोयेगी
इसके साथ. चल उठ”
तिने वर पाहिलं. पायपाच्या बाहेरच्या मावळतीच्या
उनात फक्त धूसर चेहरा दिसत होता तिला, साडी घातलेल्या एका बाईचा. साक्षात मसीहा
बनून आली होती ती. कसबसं स्वतःला सावरून ती उठली. पायपाबाहेर येवून तिने तिच्याकडे
पाहिलं आणि दचकली.
“जादा सोच मत मेरी बच्ची. जब अपनों को
पेह्चाननेमे गलती होती है तो पराये हि साया बनते है. इस नामर्द जमानेसे तो हम
हिजडे बहुत अच्छे है. आजसे तू मेरी बेटी. लक्ष्मी नाम है मेरा. एक नही, ऐसे हज्जार इम्रान आये तो भी तेरा
बाल भी बाका नही कर सकते. चल उठ और
यल्गार कर के तू तय्यार है इन सबसे लडने को.”
तिने शांतपणे आपलं डोकं लक्ष्मीच्या खांद्यावर
ठेवलं आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बराच वेळाने तिने डोळे पुसले, कचऱ्याची
पिशवी उचलून तिच्यासोबत चालू लागली....तिथे पश्चिमेचा सूर्य केशरी रंग उधळत होता
आणि इथे माय-लेकींच्या गप्पा रंगू लागल्या होत्या....
(c) © मानस (sondeshca@gmail.com) (९७६९३६२८१८)
आवडल्यास जरूर शेअर करा....विशेष विनंती:
माझे लिखाण माझ्या नावासहित व फोन नंबरसहित फॉरवर्ड करण्यासाठी माझी काहीही हरकत
नाही. बाकी हृदयस्थ परमेश्वर साक्षी आहेच. धन्यवाद...

Comments
Post a Comment