हे जीवन सुंदर आहे (त्रिवेणी लघुकथामाला - भाग 3 अंतिम)
हे जीवन सुंदर आहे (त्रिवेणी लघुकथामाला - भाग 3 अंतिम)
ऑर्किडच्या पोर्चमध्ये
होंडा सिटी वळसा घालून थांबली. व्याले पार्किंगला चावी देवून मी ब्लेझर घातला.
कॅमेरा घेवून सिक्युरिटी चेकचे सोपस्कार पार पाडून आत शिरले. मोठ्ठाल्या
झुम्बराखाली टेबलाभोवती ताज्या फुलांची सुंदर आरास केली होती. प्रसन्न मनाने मी
लिफ्टमध्ये शिरले.
टेरेसचं बटन दाबून वर पोचले,
तर लक्षात आलं कि थोडा उशीरच झालाय पोचायला. माहौल आधीच बनला होता. सॅटिन आणि
सिल्कच्या डिझायनर गाऊनमध्ये संध्याकाळ सजली होती. मानेभोवती, हातावर, कमरेवर वेलीबुट्ट्यांचे
ट्याटूज पसरले होते. काही जणींनी याहूनही उदात्त कल्पना रंगवल्या होत्या...ड्र्यागनपासून ते अॅडम-ईव्ह पर्यंत आणि
मरमेड़ पासून ते कसल्याश्या रॉकस्टारचे टॅटूज. या टॅटू कलाकारांच्या
कलेला वाव मिळावा म्हणून शरीरावर असेल नसेल ती जागा बरी मुक्तपणे मिळते.
भाग्यवंत लेकाचे!
रंगीबेरंगी स्कार्फ आणि हॅण्डबॅग्ज घेवून ललना सजल्या होत्या. लालचुटुक ओठांमध्ये सिगरेट आणि दुसऱ्या हातात वाईनचं ग्लास. बाप्यांचे सुद्धा वेगवेगळे लूक...कुणी शिवाजीसारखी दाढी राखली होती तर कुणी पोनीटेल. डार्क शेड मधले लाल, पिवळे, पिंक किंव्हा पीच ब्लेझर्स आणि लेदर जॅकेट्स फॉर्म मध्ये आहेत हल्ली. शिवाय ब्रान्डेड चष्म्यांची रेलचेल. चीज आणि चिकनचे स्टार्टर्स घेवून वेटर फिरत होते. वोडका शॉट्स घशाखाली रिते होत होते. व्हीस्कीचे ग्लासआणि बीअरचे पिंट एकमेकांवर हलकेच आदळत होते. चीअर्स!
गेले ७ वर्ष असले शोज
कवर करूनही मला या सगळयाचा भाग व्हायला जमलं नाहीय अजून. मी गर्दीतून वाट काढत
काढत पुढे सरकू लागले. मधल्यामध्ये ५० एक फूट लांबीचा काचेचा रॅम्पवॉक होता.
आजच्या फॅशन शोचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन. त्याच्या जरा जवळ जावून मी सगळे अँगल्स
तपासून बघितले. फ्लॅश आणि लाईट्स चेक केल्या. दीपक, माझा असिस्टटं, लेन्स पॅक करून सिगरेट
फुकायला गेला. मी पण जरा दम घ्यावा म्हटलं, शो सुरु व्हायला काही मिनिटं होती.
तहान लागल्यासारखं वाटून मी वेटरला शोधू लागले.
ईतक्यात वेटरच्या ट्रे मधून
सॉफ्टड्रींक उचलून तिने माझ्या समोर धरलं.
“यु डोन्ट ड्रिंक राईट?
ह्याव सम स्प्राईट विथ मिंट.”
मला नेमकं हेच हवं होतं हे
कोणी सांगितलं हिला?
“आय एम युअर होस्ट फॉर द
डे. राजाध्यक्ष सरांनी तुझी खास बडदास्त ठेवायला सांगितलंय. म्हणाले, माझी ब्राईट स्टुड़ंट आहे. तिच्या फोटोग्राफीने
तुझ्या इव्हेंटची मेडिया कवरेज विल झूम थ्रू द रुफ.”
“थँक्स.” सरांचं नाव
आलं कि अभिमान आणि दडपण अशा संमिश्र भावना मनात दाटून येतात.
इथे यजमान म्हणून भेटली नसती तर आजचं ब्रायडल वेअर कलेक्शन लाँच करणारी हीच आहे, हे मला खरं वाटलं नसत कदाचित. परफेक्ट एक्झिक्युटिव लूक होता तिचा. इतकी सुंदर पर्सन्यालीटी आणि इतकं अगत्य!
इतक्यात म्युझिक लाउड झालं
आणि ती पटकन ब्याकस्टेजला निघून गेली. मग पुढचे दीड तास मी माझ्या कॅमेऱ्याशी
खेळत होते. माझ्या काही आवडत्या गाण्यांवर डीजेने ताल धरला होता. एकामागून एक मॉडेल्स रॅम्पवर येवून
एका लयीत परतत होते. मी प्रत्येक मूड टिपण्याच्या प्रयत्नात. सगळ्या सुंदर
डिझाइन्स आणि त्यावर मीनाकारी केलेले दागिने....अप्रतीम! लेहेंग्याचा फॉल तर
भारीच, आणि त्यात शो स्टोपर म्हणून दीपिका.....घायाळ झाले मी. सर्वात शेवटी
टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं तीचं. तब्बल ५ मिनीटं स्ट्यान्डींग ओवेशन. मजा येणार
आहे आज फायनल एडिटिंगच्या कामात.
नऊ वाजता मी आणि दीपक सगळं
आटपून निघालो. ब्याकस्टेजला जावून तिचा निरोप घ्यायला मी तात्पुरत्या ग्रीनरूम
मध्ये पोचले. कपड्यांच्या गर्दीमधे एका खुर्चीवर पाय वर दुमडून ती बसली होती. राहवलं नाही म्हणून मी
तिला विचारलं “इफ यु डोन्ट माईंड. एक प्रश्न विचारू का?”
तिने मानेनेच होकार दिला.
"कसं काय म्यानेज करता
तुम्ही या पायाने?” माझ्या नजरेतून तिचे जयपूर फुट सुटले नाहीत.
“बरीचशी ट्रेनिंग आणि
फ़िजिओथेरपि. सवय होते मग. जसं तुम्हाला सवय झालेय तुमच्या चष्म्याची.” तिने
सहजतेने म्हटलं.
उत्तर ऐकून मी चमकले. इतक्या सहजपणे कोणी कसं काय सगळं
स्वीकारू शकतं? मला सरांचे शब्द आठवले....
“मुग्धा, आज तू एक शो कव्हर
करायला जातेयस इंडीपेंडंटली. फोटोग्राफी शिकशिलंस....नवीन चेहरेही कॅप्चर करशील तुझ्या कॅमेऱ्यात. पण तिथे अजून एक गोष्ट
सापडेल तुला....दुर्दम्य आत्मविश्वास आणि आयुष्यावर प्रेम करण्याची द्रुष्टी...
एकदा भेटून ये तू अनामिकाला.”
- © मानस (sondeshca@gmail.com) (९७६९३६२८१८)
आवडल्यास जरूर शेअर करा....विशेष विनंती:
माझे लिखाण माझ्या नावासहित व फोन नंबरसहित फॉरवर्ड करण्यासाठी माझी काहीही हरकत
नाही. बाकी हृदयस्थ परमेश्वर साक्षी आहेच. धन्यवाद...
Part 1 link:
https://sandeshayan.blogspot.com/2020/12/blog-post_4.html
Part 2 link:
https://sandeshayan.blogspot.com/2020/12/ss.html
Comments
Post a Comment