ब्लॉग १- प्रथम पुष्प - आमचे आप्पा : एका झुंजार वादळाची वाटचाल

ब्लॉग १- प्रथम पुष्प - आमचे आप्पा : एका झुंजार वादळाची वाटचाल

जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला हा जीवनप्रवास संपवत अखेर सर्वांचा निरोप घ्यायचा असतोच. पण काही व्यक्ती आपल्या आणि आसपासच्या सर्वांच्या आयुष्याला एक अर्थ निर्माण करत हा प्रवास पार करतात. स्व. दयाघन गोपाळ सावंत म्हणजे आम्हा सर्वांचे ‘आप्पा’ अर्थातच या पठडीत बसणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यात त्यांचा जन्म झाला. सहा महिन्याचे असताना वडील वारले. आईने कष्टाने शेती करून दिवस काढले. सावत्र बहिणीकडून सख्ख्या बहिणीची माया मिळाली. जरा वयात


येताच मामाकडे शिक्षणासाठी तालुक्याला पाठवले. घरात पडेल ती कामे करीत विद्यार्जन सुरु झाले. दोन दिवसाच्या शिळ्या भाकरीवरील बुरशी दूर करूनही खाल्ली. पण कुणापुढे हात पसरले नाहीत. गावात असतांनाच भजन, नमन, भारूड आणि नाटक यांचा लळा लागला.

सातवीपुढे शिक्षणासाठी मुंबईला मावशीकडे प्रयाण केले. शिरोडकर हायस्कुलच्या रात्रशाळेतून शालान्त परीक्षा (तेव्हाची अकरावी) उत्तीर्ण झाले. गणित विषयाचे महत्व इतके कि शाळेत गणिताचे शिक्षक नाहीत, म्हणून त्यांनी स्वतः अभ्यास करून गणित विषयासह परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. पाठीशी कोणतेही आर्थिक बळ नाही, शिक्षण-व्यवसाय यासाठी मार्गदर्शन नाही, परंतु त्यांनी आपला मार्ग स्वतः शोधला. या शिक्षणाच्या जोरावर गिरणीमध्ये नोकरीला लागले.

सन १९६६ मध्ये कु. नलिनी सावंत हिच्याशी लग्न झाले आणि त्यांना तितक्याच खंबीरपणे साथ देणारी सहचारिणी लाभली. एका पाठोपाठ एक अशी चार अपत्ये -दोन मुली आणि दोन मुले. दरम्यानच्या काळात बटाटेवडे विकले. हॉटेल चालवलं. केळीही विकली. परंतु बेरोजगार म्हणून कधीही वेळ वाया दवडला नाही. त्यानंतर आयटीआयचा डिप्लोमा कोर्स केला आणि गिरणीमध्ये फोल्डिंग मास्टर म्हणून बढती झाली. आज्जीला पक्षाघात झाल्याने ती अंधरूणला खिळली. तिला मुंबईला आणून सुनेने शेवटपर्यंत तिची मुलीप्रमाणे सेवा केली. सकाळी ५ वाजता उठून देवपूजा करणारे आप्पा रात्री ८.३०-९ वाजता घरी येत असत. पण आज्जीच्या मालिशचा क्रम त्यांनी कधीच चुकवला नाही. वडीलधाऱ्यांची सेवा करण्याचे घरातले हे संस्कार नकळतपणे आम्हा मुलांच्या रक्तात भिनत गेले.

सोबत समाजकार्यही हिरीरीने चालूच. घरात कायम अडल्यानडल्या गरिबांचा, मित्रपरिवाराचा आणि कार्यकर्त्यांचा राबता. कुणाला कागदपत्रे मिळवून देणं, कुणाला सुंदर हस्ताक्षरात करारनामा बनवून देणं, कुणाची कौटुंबिक भांडणे मिटवणं, तर कुणाच्या मुलाला दोन मुस्काटात देऊन वळणावर आणणं. कधी महापालिका अधिकाऱ्याला गरिबांवर कारवाई करण्यापासून रोखणं, तर गरिबांकडून खंडणी उकळणाऱ्या राजकीय आणि गुंड प्रवृत्तींना समज देणं. त्यांनी शेकडो तरुणांना नोकऱ्या लावल्या. अनेक संसार व्यसनापायी किंव्हा सासू-सुनांच्या भांडणांपायी उध्वस्त होण्यापासून वाचवले. कित्येक तरुणांना सरळमार्गाला लावले. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना विना-डोनेशन प्रवेश मिळवून दिले.

शाळेचे किंव्हा महाविद्यालयाचे निकाल लागले कि कागदपत्रांची सत्यप्रत घेण्यासाठी नेहमीच मुले आणि पालक येत असत. आम्ही मुले त्यांचे स्वीय सहाय्यक जणू - शिक्के मारून देण्यासाठी. तेंव्हा समजलं कि अश्या कामासाठीही तथाकथित 'जनसेवक' पैसे घेतात. गरिबी माणसाला किती नाडते याचं प्रात्यक्षिक आम्हाला याच दिवसात दिसलं.          

आप्पांनी जिवाभावाचे मित्र जोडले. प्रसंगी पदरमोड करून मित्रांची कामं केली. रात्री-अपरात्री धावून गेले. आणि या मित्रांनी सुद्धा मैत्रीचं वाण जपलं. एका मित्राच्या लग्नासाठी पैसे कमी पडतात म्हणून स्वतःचा विमा सरेंडर करून त्याला मदत केली.  असे थोडेसे लहरी परंतु मनस्वी व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आप्पा. त्यांच्या पुढील पिढ्यांसोबत हा घरोबा आजही कायम आहे.

आप्पा ‘कोलेवाडी सावंत विकास मंडळा’चे सक्रिय कार्यकर्ते, नंतर अध्यक्षही. ‘कोणत्याही सामाजिक संस्थेचा आर्थिंक पाय जितका मजबूत तितकी मंडळाची झेप अधिक उंच’ हा त्यांचा कानमंत्र. मग मंडळासाठी देणग्या गोळा करणे, नाटकासारखे कार्यक्रम आखून निधी उभा करणे यासारखे उपक्रम आखले. वैद्यकीय शिबिरे, रक्तदान शिबिरे, कामगार मेळावे, केदारलिंग कुलदेवतेच्या मंदिराचा जीर्णोद्धार, (स्वतःची जमीन देऊन) गावाची नळपाणी योजना तडीस जावी म्हणून पुढाकार आणि बरेच काही. गावाच्या उत्सवात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला.

गिरणी कामगार लढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि (स्वतः मॅनेजमेंटचा भाग असूनही) कामगारांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १९८५ च्या सुमारास संपात सहभागी झाले. त्याचाच पुढचा अध्याय म्हुणुन महापालिकेची निवडणुकही लढवली. आणि अर्जुनाप्रमाणे मित्र, नातेवाईक यांच्याविरुद्ध प्रसंगी पवित्रा घ्यावा लागतो याचाही प्रत्यय घेतला.        

दरम्यान संप चिघळला. आप्पांचे राज्यव्यापी दौरे सुरु झाले आणि कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले. आईने खंबीरपणे संसार सावरला. चार मुलांचे शिक्षण आणि आप्पांच्या समाजसेवेच्या व्रताशी ती जणू बांधील होती. कालान्तराने आप्पांनी राजकारणापासून फारकत घेतली. फक्त निवडणुकांपुरती भूमिका घेतली. आणि स्वतःला समाजकार्य आणि व्यवसायात झोकून दिलं.

विक्रोळी पार्कसाईट हि त्यांची कर्मभूमी. आमचा विभाग संमिश्र लोकवस्तीचा. मजुरांचा, कारकुनांचा आणि सरकारी नोकरांचाही. वसाहतीच्या शेकडो मध्यमवर्गीयांना सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सभासद बनवून घराघरात पाणी आणले. दिवाळीत बेगसाहेबांना करंज्या आणि ईदमध्ये सावंत साहेंबांना शीरखुर्मा देणाऱ्या समाजाचे आम्ही भाग होतो. सत्यनारायण पूजा आणि प्रजासत्ताक दिन तितक्याच हिरीरीने साजरे होत असे. दहीहंडी आणि होळीचे सण सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने साजरे करीत. १९९२-९३ च्या दंगलीत मोहल्ला शांतता समितीचे आप्पा प्रमुख होते. मिश्र लोकवस्ती असणाऱ्या आमच्या विभागातील एकाही घरावर दंगेखोरांनी हल्ला केला नाही. अप्पांचा दराराच इतका होता कि शस्त्र परजणारी टोळकी हत्यारं लपवून दबक्या पावलांनी निघून जात आणि आम्हाला खिडकीच्या फटीतून पाहता पाहता त्यांचं संभाषण ऐकू जाई, "संभालकें, सावंतसाब का मोहल्ला है...." आज जी सामाजिक तेढ वाढलेय ती पाहता आप्पा आणि त्यांच्या समकालीन लोकांचं महत्व आभाळाएवढं वाटू लागतं ते यासाठीच. 

मग पर्व आलं व्यवसायभिमुख होण्याचं. शून्य राजकारण, जमेल तेवढं समाजकारण आणि पूर्णवेळ व्यवसाय. जवळपास सहा वर्ष बांधकाम व्यवसायात काम केलं आणि त्यानंतर चार वर्ष किराणा मालाचं दुकान. आई आणि मोठा भाऊ यांचं सहकार्य होतंच. नंतर गारमेंट व्यवसायात पदार्पण केलं, तेही वयाच्या पन्नासाव्या वर्षी! कोणताच व्यवसाय त्यांनी नुकसानीत केला नाही. आणि व्यवसायाचे कोणतेही शास्त्रोक्त शिक्षण आणि पदवी नसताना देखील ते यशस्वीपणे केले. वाट चालत राहिले. चारही मुलांची शिक्षणं पूर्ण केली. मुलींची लग्ने लावून दिली. आणि वयाच्या साठाव्या वर्षी मुलांच्या आग्रहास्तव निवृत्तही झाले.  

निवृत्तीनंतरची जवळपास पंधरा वर्ष त्यांनी मुलुंडमध्ये काढली. तिथेही नवीन मित्रपरिवार जमवला. जेष्ठांच्या वार्षिक सहली काढल्या. बटाटे वडे आणि भजी खाल्ली. पाणीपुरी अनु शेवपुरीचा आस्वाद घेतला. सोसायटीच्या कारभारात लक्ष घातलं. मुला-नातवंडांत रमले. २००६ साली त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली. त्यातून ते सावरलेही. कोकणात नित्यनियमाने आईसोबत वाऱ्या केल्या. मनसोक्तपणे होळी आणि गणपती उत्सव पाहिले. कोकण रेल्वेची सोय छान उपभोगली. गावाच्या घराच्या मागे सुंदर विहीर बांधली आणि अंगणात चिऱ्यांचं कंपांउंडही. घराची डागडुजी केली. हापूस आंब्याच्या झाडांची आणि काजूची निगा राखली.     

अत्यंत व्यवहारी आणि निर्णयतत्पर असणारे आप्पा त्यांच्या मुलांच्या तसेच सहजनांच्या भविष्याप्रती नेहमीच काटेकोरपणे वागले. एक आगळीवेगळी दूरदृष्टी त्यांना नैसर्गिकपणे लाभली होती. त्यांच्या या सडेतोड स्वभावामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे काही मने पण दुखावली. पण त्यांनी कधीच त्याची तमा बाळगली नाही. कारण स्वतःच्या निर्णयक्षमतेबाबत ते कधीच साशंक नव्हते. घेतलेल्या निर्णयांकडे मागे वळून न पाहता उद्देशपूर्तीपर्यंत नेणे हि त्यांची हातोटी होती. हेच त्यांच्या जीवनच सूत्र होतं. 'धर्मापेक्षा देश आणि माणुसकी मोठी. आणि जीवन वाचवण्यापेक्षा मोठं सत्कर्म कोणतंही नाही' यावर त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांनी आपल्या कृती आणि उक्तीतून आम्हाला हे बाळकडू पाजलं.

आणि साधारण २०११ च्या सुमारास त्यांना नुरोलॉजि संबंधित त्रास जाणवू लागला. हालचाली मंदावू लागल्या. हिंडण्याफिरण्यावर बंधने आली. २०१४ साली त्यांना ब्रेन हॅमरेज झालं आणि हळूहळू ते अंथरुणाला खिळले. सोबत एक अटेंडंट. आणि आई २४ तास लक्ष ठेवून. त्यांच्यासारख्या बहुआयामी आणि फिरस्त्या माणसावर शारीरिक बंधनं आली. परंतु त्याही अवस्थेत त्यांचा करारीपणा कायम होता. कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचं मत आम्हा सर्वांना हवं असायचं आणि त्यांनाही त्यात समाधान असे. हा आजार बळावत जाऊन अखेर २०१९ साली त्यांना लिक्विड डाएटवर ठेवावं लागलं. त्यातून त्यांची तब्येत ढासळत गेली. आणि १ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.  

कोकणातून हातात कवडीही न घेऊन मुंबईत आलेल्या आणि निरपेक्ष भावनेनं लोकसेवा करणाऱ्या या अवलियाने हजारो कुटुंबांच्या जीवनात आनंद आणि सुबत्ता आणली. एका तुफानाने चीर:शांती घेतली. एक वादळ शमलं.

आज त्यांच्या जन्मदिनी  'संदेशायन' चा आरंभ करताना हे प्रथमपुष्प आम्हा उभयांतर्फे त्यांच्या चरणी अर्पण....

''दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती'

 -    संदेश दयाघन सावंत (मानस) आणि समिधा संदेश सावंत

१५ नोव्हेंबर २०२०    

Comments

  1. संदेश
    तुमच्या वडिलांचे कर्तुत्व खूप मोठं आहे.
    साधारण वर्ष दीड वर्षापूर्वी त्यांची आणि माझी भेट आपल्या संकुलात पहिल्यांदा च झाली. त्या वेळी देखील बराच वेळ ते आपल्या गतकाळातील कार्याबद्दल माझ्या शी खूप बोलले. बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर खुप समाधान दिसत होते.
    त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो अशी प्रार्थना..

    मी पूर्वी मुलुंड येथील विश्वकर्मा नगर मधील वनिता सोसायटी त राहातं होतो. आणि तुमचे कोणी नातेवाईक आमच्याच इमारतीत रहात होते. त्या वरून ओळख आणि मग आमच्या मध्ये सर्व संवाद झाला.

    ReplyDelete

Post a Comment